मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश सुपुर्द
मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून नागपाडा पोलीस रुग्णालयास वैद्यकीय सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी दीड कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना सुपुर्द करण्यात आला.
नागपाडा पोलीस रुग्णालय व त्याच्या अधिपत्याखालील उप पोलीस रुग्णालये तसेच अन्य १२ पोलीस रुग्णालयांमध्ये पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना अधिक चांगल्या वैद्यकीय सेवा-सुविधा पुरविता याव्यात यासाठी अत्याधुनिक उपकरणांची आवश्यकता आहे. ही उपकरणे खरेदी करण्यासाठी दीड कोटी रुपये इतका निधी देण्याचा निर्णय श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाने घेतला. त्यास शासनाच्या विधि व न्याय विभागानेही मान्यता दिली. त्यानुसार या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते पोलीस आयुक्त श्री. बर्वे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
यावेळी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त भरत पारीख, महेश मुदलीयार, आनंद राव, गोपाळ दळवी, संजय सावंत आदींसह न्यासाच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियांका छापवाले आदी उपस्थित होते.