नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाची भिती सर्व राज्यांना सारखीच असल्यानं त्याच्या प्रतिबंधासाठी केंद्र आणि सर्व राज्यांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ते काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना बोलत होते. कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात कोणतीही कसूर राहता कामा नये असं ते म्हणाले.
देशातल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक पावलं उचलत सरकारी सूचनांचंही सर्वतोपरी पालन करावं, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केलं आहे.
यात लोकसहभाग महत्वाचा असून याबाबतची भिती अनाठायी असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी यावेळी सर्व राज्यांकडून होत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं.