मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे सरचिटणीस आणि  राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज सकाळी साडेअकरा वाजता हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सातव यांच्या  कुटुंबियांसह  देशभरातल्या  हजारो चाहत्यांनी अंत्यदर्शन घेऊन साश्रूनयनांनी त्यांना निरोप दिला. राजीव सातव यांच्यावर पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर रात्री त्यांचं  पार्थिव कळमनुरी इथं त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर देशभरातून चाहत्यांनी कळमनुरी इथं मोठी गर्दी केली होती.

यावेळी कोरोना नियमांचं  पालन करून, सामाजिक अंतर ठेवत जमलेल्या चाहत्यांनी आपल्या  नेत्याला अखेरचा निरोप दिला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी  त्यांच्या वतीने  सातव  यांना पुष्पचक्र वाहण्यात आलं. यावेळी  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री  वर्षा गायकवाड, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वंजीत कदम, खासदार हेमंत पाटील,  यांच्यासह राजकिय  नेत्यांनी  त्यांना आदरांजली वाहिली.  जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. त्यानंतर पोलीस विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.