नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं रक्षण करणाऱ्या सशस्त्र दलांचा भारताला अभिमान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज राजस्थानात जैसलमेर इथं लोंगोवाला चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली, त्यावेळी ते बोलत होते.

सैनिक आहेत म्हणून देश आहे, आज सर्व भारतीयांच्या शुभेच्छा आणि प्रेम घेऊन आलो आहे, त्याचबरोबर देशातल्या प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद घेऊन आलोय, अशा शब्दांत प्रधानमंत्र्यांनी भारतीय जवानांचा गौरव केला. हिमालयाचं शिखर असो, वाळवंट असो, घनदाट जंगल असो किंवा समुद्र, भारतीय सैनिकाचा प्रत्येक ठिकाणी विजय झाल्याचं त्यांनी नमूद केलं.

भारताजवळ ताकद आणि चोख प्रत्युत्तर देण्याची इच्छाशक्ती असून, विस्तारवादाविरुद्धही भारत आवाज उठवत असल्याचं ते म्हणाले. सीमेवर सैनिकांचं धैर्य कायम राखण्यासाठी त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं सांगून मोदी यांनी राष्ट्र सुरक्षेसाठी तत्पर असलेल्या सैनिकांना नमन केलं.

दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिवाळी साजरी करण्यासाठी थेट गडचिरोली गाठण्याचा निर्णय घेतला आहे. ”पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मी गडचिरोलीमधल्या पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. चोवीस तास जनसेवेत असलेल्या पोलिसांचा उत्साह वाढवणं ही माझी जबाबदारी आहे.

त्यामुळे घरी न थांबता मी थेट ‘फिल्ड’वर जाण्याचे ठरवले. कठीण स्थितीत सेवा करणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढवन्याचा माझा प्रयत्न आहे, असं देशमुख यांनी सांगितलं.