नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्राह्मोस या स्वनातित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कारनिकोबार बेटांवरून घेण्यात आली. क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरात २०० किलोमीटर दूर असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणारा भक्कम आधार पुण्यातल्या संशोधन संस्थेने दिला आहे.
आज यशस्वी चाचणी करण्यात आलेले ब्राम्होस क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणाऱ्या प्लॅटफॉर्मचे संशोधन आणि निर्मिती पुण्याच्या विश्रांत वाडीच्या संशोधन आणि विकास संस्थेने अर्थात R&DEने केली आहे. संशोधन आणि विकास संस्था ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची एक प्रयोगशाळा आहे.
ब्राम्होस हे जगातील अतिवेगवान क्षेपणास्त्र असून ते जमिनीवरून, युद्ध नौका, पाणबुडी आणि लढाऊ विमानातून डागता येते. या चारही ठिकाणाहून ब्राम्होस क्षेपणास्त्र डागण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म लागतात आणि या सर्व प्लॅटफॉर्मची निर्मिती R&DEने केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म साधारण १५ वर्षांपूर्वी संशोधन करून तयार करण्यात आले आहेत. ब्राम्होस क्षेपणास्त्रामध्ये पण अनेक बदल झाले ते वेळोवेळी विकसित करण्यात आले, पण ते डागण्यासाठी लागणाऱ्या प्लॅटफॉर्मध्ये फारसे बदल करावे लागले नाहीत.
R&DEने तयार करून दिलेल्या प्लॅटफॉर्मवरून ब्राम्होस क्षेपणास्त्राच्या सगळ्या प्रकारच्या चाचण्या करता येतात. ब्राम्होस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रयत्नांतून तयार केलेले क्षेपणास्त्र असून त्याचा वेग स्वनातीत आहे.