नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्रालयाने १ ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी कोविड-१९ व्यवस्थापनाबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या.
कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांना मिळत असलेले यश कायम राखणे, तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा नव्याने वाढणारा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना आणि विलगीकरणाबाबतच्या नियमांची कडक अंमलबजावणी, यावर नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये भर दिला आहे.
या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस आणि पालिका प्रशासनाची असेल. तसेच स्थानिक परिस्थितीनुसार कोविड-१९ ला आळा घालण्यासाठीचे निर्बंध लागू करण्याचा अधिकार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना राहील.
आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने प्रतिबंधित क्षेत्रे निश्चित करावीत, ही यादी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी संकेतस्थळावर सूचित करावी आणि आरोग्य मंत्रालयाकडे द्यावी असे यात म्हटले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये दिले असून याठिकाणी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. यानुसार प्रतिबंधित क्षेत्रात तातडीची वैद्यकीय सेवा वगळता अन्य कामासाठी कोणालाही आत अथवा बाहेर जायला प्रवेश मिळणार नाही.
कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरता स्थानिक प्रशासनाने तपास, चाचणी आणि उपचार ही त्रिसूत्री प्रभावीपणे राबवावी.