नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या सुधारीत कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी आज बैठक झाली. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल या बैठकीला उपस्थित होते. सरकारनं काल शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती उद्या राज्यात उग्र आंदोलन करणार आहे. समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितलं. या आंदोलनाला काँग्रेस पक्षानं पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचं रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारनं केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकरी विरोधी वीजबिल विधेयक पुढे रेटण्याचं कारस्थान बंद करा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे.