नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या जगभरातल्या विविध कंपन्यांनी लसीच्या तातडीच्या मान्यतेसाठी संबंधित यंत्रणांकडे अर्ज केले आहेत. मॉडर्ना कंपनीनं अमेरिकेच्या औषध नियामक प्राधिकरणाकडे अर्ज केला असून लसीची परिणामकारकता 94 पूर्णांक 1 शतांश टक्के असल्याचा दावा केला आहे. डिसेंबर महिन्यातच २ कोटी लोकांना लस वितरीत करण्यासाठी अमेरिकेनं आराखडा तयार केला आहे.

फायझर आणि बायोटेक यांनी युरोपिय महासंघाकडे काल मान्यतेसाठी अर्ज केला. लसीला मंजूरी मिळाली तर युरोपमधल्या देशात पुढील वर्ष सुरू होण्याआधीच लस उपलब्ध होईल. रशियाच्या सहकार्यानं डॉ. रेड्डीज तयार करत असलेल्या लसीची वैड्यकीय चाचणी लवकरच सुरू होईल अशी माहिती डॉ. रेड्डीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काल दिली. दरम्यान, जगभरातल्या कोरोनाबाधितांची संख्या ६ कोटी २८ लाख ४० हजारांवर गेल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे.