मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेत फूट पडल्यानं राज्याातल्या  महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याविषयी निर्माण झालेली अनिश्चितता अद्याप कायम आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. गुवाहाटी इथल्या हॉटेलमधून या सर्वांची एकत्र छायाचित्रं आणि ध्वनिचित्रमुद्रण समाजमाध्यमांवर प्रकाशित झालं आहे. दरम्यान शिंदे यांचा दावा शिवसेनेने फेटाळला आहे. भारतीय जनता पार्टीने शिवसेनेच्या आमदारांची फसवणूक करुन त्यांना पळवून राज्याबाहेर नेल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केला. विदर्भातले आमदार नितीन देशमुख या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. सुरतच्या सरकारी रुग्णालयात आपल्याला जबरदस्तीनं दाखल करुन इंजेक्शन दिल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्याला फसवून राज्याबाहेर नेलं होतं मात्र आपण कशीबशी सुटका करुन घेतली, असं आमदार कैलास पाटील यांनी सांगितलं. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न फसल्यामुळे भाजपाने हे कारस्थान रचलं असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. महाविकास आघाडीतूून बाहेर पडण्याची मागणी जर शिंदे गटाची असेल तर त्यांनी येत्या २४ तासात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेटून बोलावंं त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल, असं  संजय  राऊत यांनीी सांगितलं. मात्र याकरता त्या आमदारांनी मुबईत येऊन ठाकरे यांना भेटावं यावर त्यांनी भर दिला.