मुंबई (वृत्तसंस्था) : गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागानं घेतला आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास रक्तपेढीवर पाच पट दंड आकारला जाईल.
रक्ताशी निगडित आजार असलेल्या रुग्णांकडे राज्य रक्त संक्रमण परिषदेचं ओळखपत्र असेल, तर त्यांना मोफत रक्त पुरवठा केला जातो, अशा रुग्णांकडून प्रक्रिया शुल्क आकारल्यास, रक्तपेढीला तीन पट दंड केला जाणार आहे. या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
दरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातल्या रुग्णालयांमधे रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे, ती दूर करण्यासाठी जनतेनं पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. सध्या मुंबईत ५८ आणि उर्वरित राज्यात ३४४ रक्तपेढ्या आहेत. यात केवळ पुढचे ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याचं त्यांनी सांगितलं.
रक्त तुटवड्याची परिस्थिती लक्षात राजकीय पक्ष आणि तसंच धार्मिक, सामाजिक आणि गृहनिर्माण संस्थांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचं आयोजन करावं, वैयक्तिक रक्तदात्यांनी आपल्या जवळच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.