नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात पुढच्या काही आठवड्यात कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होईल, अशी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते.
देशात सध्या आठ ठिकाणी सुरू असलेलं या लसीबाबतचं संशोधन, विकासाच्या विविध टप्प्यांमध्ये आहे. शास्त्रज्ञांकडून या लसीला मान्यता मिळाल्यानंतर लसीकरण सुरू केलं जाईल, असं सांगितलं. या लसींची साठवणूक तसंच पुरवठ्यासाठी शीतगृहांची उभारणी केली जात असून, आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्ध्यांना प्राधान्यानं लस दिली जाणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
लस येईपर्यंत कोविड त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं. जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन, द्रविड मुनेत्र कळघमचे टी आर बालू यांच्यासह अनेक पक्षांचे नेते सहभागी झाले होते.