नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतमालाची हमीभावानं खरेदी सुरूच राहील; अशी ग्वाही केंद्र सरकारनं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पुन्हा दिली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सोडवण्याचं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी काल शेतकऱ्यांसोबत चर्चेच्या पाचव्या फेरीत दिलं.

शेतकरी प्रतिनिधींनी कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर सरकारनं या कायद्यांच्या सर्व घटनात्मक तरतूदी स्पष्ट केल्या.

बाजार समित्या, खाजगी बाजार आणि मार्केट यार्ड यांच्यात समन्वय असावा तसंच बाजार समित्यांबाहेर केलेल्या व्यवहारांचीही योग्य नोंदणी होणं आवश्यक आहे असं मत शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केलं.

शेतकरी संघटनांनी आपले विचार व्यक्त केल्याबद्दल तोमर यांनी आभार मानले आणि सरकार नेहमीच त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास तयार आहे असं आश्वासन दिलं.