पुणे: कोरोना विषाणूची परिस्थिती नियंत्रणात असली, तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून चाचण्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज दिले. कोरोना चाचण्या वाढविण्यासोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा तसेच येत्या 17 जानेवारी 2021 रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमे अंतर्गत बालकांना पोलीओ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आज कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, पल्स पोलिओ लसीकरण, कोविड लसीकरण नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी  कोरोना अद्याप गेलेला नाही, आताही धोका कायम आहे. त्यामुळे सर्वांनी स्वयंशिस्त पाळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे. तसेच पुढील कालावधीतील संभाव्य अंदाज विचारात घेत तयारी ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासोबतच लसीकरणासाठी  माहिती संकलित करताना अचूकता ठेवा तसेच चाचण्यांची संख्या वाढवा, अशा सूचना देत येत्या 17 जानेवारी 2021 रोजी देण्यात येणारे  पल्स पोलिओ लसीकरण बालकांना करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी कोरोना स्थिती व उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. कोरोना उपाययोजना आढावा बैठकीसोबतच कोरोना लसीकरण तसेच पल्स पालिओ लसीकरणाबाबतही आढावा घेण्यात आला. यावेळी आरोग्य विभागासोबतच विविध विभागातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.