नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यटकांसाठी प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी केंद्र सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. सरकार नवीन योजना बनवण्याबरोबरच त्या पूर्ण करण्यालाही प्राधान्य देत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आग्रा मेट्रोच्या कामाचं भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते. गेल्या सहा वर्षात देशात मेट्रोचं जाळं वेगानं विस्तारलं आहे. आत्ताच्या घडीला देशातल्या 27 शहरांमध्ये मेट्रोचं काम एकतर पूर्ण झालं आहे अथवा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे असं मोदी यांनी सांगितलं.

आग्रा मेट्रो हा दोन मार्गिका असणारा एकंदर साडे 29 किलोमीटरचा मार्ग आहे. पर्यटकांचं आकर्षण असणारा ताजमहाल, आग्र्याचा किल्ला, सिकंदरा रेल्वे स्थानक आणि बसस्थानक यांना ही मेट्रो जोडणार आहे. आग्रा शहरातील 26 लाख लोकांसह दरवर्षी या शहराला भेट देणाऱ्या 60 लाख पर्यटकांनाही याचा फायदा होणार आहे.  पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा असून यासाठी 8 हजार 379 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. चार महत्त्वाची रेल्वे स्थानकं, बस स्थानकं, महाविद्यालये, शाळा, कार्यालयं, मॉल्स,  निवासी भाग अशा सर्व ठिकाणी सहजपणे पोहोचण्यासाठी पर्यावरणपूरक, आरामदायी वाहतूक सुविधा या मेट्रोच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.