नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधुनिकतेनं परिपूर्ण असणारं नव संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसद भवनाच्या नव्या इमारतीची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.

सध्याच्या संसद भवनानं देशाची स्वातंत्र्य चळवळ आणि जडणघडण पाहिली आहे. ही संसद आपल्या सफलतेचं प्रतिक आहे. संसदेचा हा वैभवशाली इतिहास लक्षात ठेवतानाच वर्तमान स्थितीही लक्षात घेतली पाहिजे, गरजेनुसार वेळोवेळी या संसद भवनात बदल करायला लागले.

मात्र आता या इमारतीला विश्रांतीची गरज आहे, २०२२ पर्यंत ही नवी इमारत पूर्ण होईल, आणि नवं संसद भवन देशाच्या स्वातंत्र्याच्या पंचहात्तरीचं साक्षीदार असेल, असं ते म्हणाले.

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रिय मंत्रिमंडळातील इतर सदस्य तसंच संसद सदस्य यावेळी उपस्थित होते.