मुंबई (वृत्तसंस्था) : पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढ तसेच केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते राबसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या वक्तव्याच निषेध करण्यासाठी शिवसेनेने आज राज्यभर आंदोलने केली.

रायगड जिल्ह्यात शिवसेनेने मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन केले. यामुळे मुंबई गोवा महामार्गवर माणगाव इथे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

नंदुरबार जिल्ह्यात नेहरू पुतळा परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गाड्यांना धक्का मारून चालवत दरवाढीचा निषेध केला. या दरवाढीकडे केंद्र सरकार डोळेझाक करत आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी दानवे यांच्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.

हिंगोली जिल्हातही शिवसेना जिल्हाप्रमुख आणि स्थानिक आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन झाले.

सोलापूरमधे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढून इंधन दरवाढ आणि दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

यवतमाळमधे शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन केले. यावेळी आंदोलकर्त्यांनी दरवाढीसह दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

वाशिममध्ये शिवसेनेने अकोला-नांदेड महामार्गावरच्या जिजाऊ चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे सुमारे तासाभरासाठी वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनकर्त्यांनी दानवे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

धुळ्यात शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन झाले.

नाशिक शहरात शालिमार चौक इथे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन झाले.

परभणीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निषेध आंदोलन केले.