मुंबई: आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये ज्या थोर महापुरुषांनी योगदान दिले आहे त्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे चतुरस्र् व्यक्तिमत्त्व असून आपल्या सर्वांसाठी सदैव स्फूर्तीदायक व दिशादर्शक आहेत. भारताच्या सर्वांगिण विकासासाठी लोकशाहीप्रणित भारतीय संविधान निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर कधीही न फिटणारे उपकार असल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. सद्याची कोविड-१९ परिस्थिती पाहता महापरिनिर्वाणदिनी जनतेने घरूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले.

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक व इतर विविध क्षेत्रात अतुलनीय मौलिक कार्य करून बाबासाहेबांनी आपले खरे राष्ट्रप्रेम दाखवून दिले. दरवर्षी लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात पण ह्यावर्षी कोविड-१९ च्या संकटामुळे चैत्यभूमीवर न येता प्रत्येकाने घरूनच दर्शन घ्यावे.

महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाइन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधेचे नियोजन राज्य सरकार आणि महापालिका असून त्यामुळे जनतेने घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करावे, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.