नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज सुरु आहे. याबरोबरच काही पोटनिवडणुकांचीही मतमोजणी आज आहे. मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. प्रारंभीचे कल पाहता पंजाब वगळता इतरत्र भाजपानं आघाडी घेतली आहे. तर, पंजाबमधे आप निर्णायक बहुमत मिळवत असल्याचं चित्र आहे. सघळ्यांचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला निर्णायक आघाडी मिळाली आहे. उत्तर प्रदेशमधल्या ४०३ पैकी २६८ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीचे १३० उमेदवार आघाडीवर आहेत. इथं काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाचे प्रत्येकी २ आणि १ उमेदवार आघाडीवर आहेत. पंजाबमध्ये आप विजयाच्या उंबरठ्यावर आहे. पंजाबमधल्या ११७ पैकी ९२ जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. इथं काँग्रेस १८ जागांवर आणि भाजपाचे केवळ २ उमेदवार आघाडीवर आहेत. उत्तराखंडमधल्या ७० जागांपैकी भाजपा ४८ जागांवर तर, काँग्रेस १८ जागांवर आघाडीवर आहे. मणिपूर मध्ये सत्ताधारी भाजपा प्रणित आघाडी पुढे आहे. ६० जागांच्या विधानसभेत भाजपा २८ काँग्रेस ४ आणि एनपीपी ८ जागांवर आघाडीवर आहे. गोव्यातल्या ४० जागांपैकी सध्या भाजपा २० जागांवर तर, काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे.