नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी किती काळ लागेल हे निश्चित सांगता येत नाही, मात्र किमान तीन वर्षे तरी लागतील, असे विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपतराय यांनी सांगितले. ते आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या निर्मितीला सुरुवात होण्यापासून त्यासाठी जमा होणारा निधी, मंदिराची रचना आणि बांधकाम करणाऱ्या कंपन्या याबाबत चंपतराय यांनी यावेळी माहिती दिली.
मंदिराचे भूमिपूजन झाले असले तरी अजून उभारणीला सुरुवात झाली नाही. मात्र त्याआधीच भक्तिभावाने लोक आर्थिक रूपाने आपला सहभाग नोंदवत आहेत. त्यात शिवसेनेकडून १ कोटी रुपयांचा निधी बँक खात्यात जमा झाला असल्याचे चंपतराय यांनी सांगितले.