मुंबई: बिहार व अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व माजी विधान परिषद सदस्य श्री.राम दत्तात्रय प्रधान, माजी राज्यमंत्री व विधान परिषद सदस्य श्री. विनायकराव पुंडलिकराव पाटील आणि माजी विधान परिषद सदस्य श्री. संदेश लक्ष्मण कोंडविलकर यांच्या दु:खद निधनाबद्दल संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी शोकप्रस्ताव सादर केला. या प्रस्तावान्वये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिवंगतांना आपल्या भाषणातून आदरांजली अर्पण केली.

सभापती  रामराजे नाईक-निंबाळकर हे भावना व्यक्त करताना म्हणाले, देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे हे दिवंगत नेते होते. राम प्रधान यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. विनायकराव पाटील यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीबाबत त्यांना कृषीभूषण पुरस्कार तर, वन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वनश्री आणि प्रियदर्शनी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. कोंडविलकर यांचेही सामाजिक कार्य उल्लेखनीय होते.

यावेळी उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, सदस्य सर्वश्री शरण रणपिसे, नरेंद्र दराडे, भाई गिरकर आदींनीही माजी दिवंगत सदस्यांना आपल्या भाषणातून श्रद्धांजली अर्पण केली.