मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरूवात झाली. विधान परिषदेत अधिवेशनाच्या सुरूवातीलाच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कामकाजातल्या विषयांवरून तसंच नियोजित वेळेवरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

परंतु या साऱ्या हरकती सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावल्या. नंतर विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. परंतु सभापतींनी या सर्व बाबी फेटाळल्यामुळे विरोधक आक्रमक झाले.

त्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. याच गदारोळात सभापतींनी पुढचं कामकाज उरकून घेतलं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू होताच शोकप्रस्तावावर चर्चा सुरू झाली.

विधानपरिषदेत २१ हजार ९९२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या अर्थ राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सभागृहात सादर केल्या.अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत, सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी विधीमंडळ परिसरात ढोल वाजवून आंदोलन केलं. प्रश्न तेवत ठेवण्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं धोरण असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.