नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थात MSME दिलासा देणारा निर्णय आज जाहीर केला. यानुसार ५० कोटी रुपयापर्यंतची गुंतवणूक आणि २५० कोटींपर्यंतची उलाढाल असलेल्या उद्योगांना MSME साठी असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळेल. यामधून निर्यातीतून होणारी उलाढाल वगळण्यात आली आहे. या अटीत बसणाऱ्या नोंदणीकृत स्टार्टअपला देखील हा फायदा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज ही माहिती दिली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये MSME ची व्याप्ती वाढविण्यात आली होती. ती आणखी वाढविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.

संकटात असलेल्या MSME साठी २० हजार कोटींच्या विशेष फंडांची घोषणा करण्यात आली आहे. याचा लाभ देशातल्या २ लाख उद्योगांना होणार आहे.