नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर परवापर्यंत गंभीर स्वरूपाच्या चक्री वादळामध्ये होण्याची शक्यता असून, हे वादळ येत्या ३ जूनला महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवरून पुढे सरकेल, अशी शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. या वादळाला निसर्ग हे नाव देण्यात आलं आहे.
परवा म्हणजे ३ जूनला हे वादळ राज्यात हरिहरेश्वर जवळ किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. त्या खेरीज मुंबई,ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, मीरा, भाईंदर, वसई आणि विरार परिसरालाही वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
यावेळी ताशी १०५ ते ११० किलोमीटरच्या वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून, मुंबई आणि परिसर या चक्रीवादळाच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता आहे, तसंच या काळात राज्याच्या किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
या वादळामुळं हवामान खात्यानं लाल दर्जाचा इशारा जाहीर केला आहे. त्यामुळं अरबी समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी परत यावे असे आवाहन करण्यात आले आहे.