मुंबई: भारतातील सर्वात मोठा फास्टॅग प्रदाता, व्हील्सआय टेक्नोलॉजीने नवे फीचर लाँच केले आहे. चुकीच्या फास्टॅग कपातीनंतर तत्काळ व आपोआप रिफंड मिळण्याकरिता या फिचरचा वापर होईल. जकातीच्या व्यवहारांबाबत अनेक अडचणींना सामोरे जाणाऱ्या लाखो ट्रक मालकांना या फिचरचा उपयोग होईल. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत फास्टॅग मॅनेजमेंट सिस्टिमद्वारे चुकीचे टोल व्यवहार ओळखले जातील आणि ३ ते ७ दिवसांच्या कालावधीत ते रिफंड केले जातील. याआधी या पूर्ण प्रक्रियेसाठी ३० दिवस लागत होते. इतर भागीदार बँकांसह, एनपीसीआय आणि आयडीएफसी आदी स्टेकहोल्डर्सनी या सुविधेचे स्वागत केले आहे.

फास्टॅगद्वारे दैनंदिन टोल वसुली ही जवळपास ७० कोटी रुपये आहे. यापैकी जवळपास ६० कोटी रुपये हे कमर्शिअल वाहन मालकांकडून येतात. ५ लाख फास्टॅग खाते धारकांवर केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, दिवसातील ३% टोल व्यवहार हे चुकीचे असतात. ऑटोमेटेड रिफंड सुविधेद्वारे हे २ कोटी रुपयांपर्यंतचे टोल व्यवहार सुधारण्याचा उद्देश आहे.

व्हील्सआयचे ईआयआर सोनेश जैन म्हणाले, “फ्लीट मालकांना सक्षम करणे आणि चुकीच्या टोल कपातीवरून होणारी समस्या दूर करणे, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ऑटो रिफंड सिस्टिमद्वारे संपूर्ण रिफंड प्रक्रियेचे रिव्हर्स इंटिग्रेशन होईल. त्यामुळे रिफंड तत्काळ मिळतील. सध्या या प्रक्रियेसाठी ३ ते ७ दिवस लागतात, मात्र जून २०२१ च्या अखेरपर्यंत ते तत्काळ होतील यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.”