नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक स्तरावर निकोप आणि स्वच्छ खेळांचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले असून वैज्ञानिक संशोधनासाठी जागतिक अँटी-डोपिंग एजन्सीला (वाडा) दहा लाख डॉलर्स देण्याचा संकल्प केला आहे. यामुळे वाडाला अभिनव अँटी-डोपिंग चाचण्या आणि शोध पद्धती विकसित करण्यास मदत होईल. या निधीचा वापर वाडाच्या स्वतंत्र तपास आणि गुप्तचर विभागाला अधिक बळकट करण्यासाठी केला जाईल.
चीन, सौदी अरब आणि इजिप्तसह इतर जागतिक सरकारांनी दिलेल्या योगदानामध्ये भारताचे दहा लाख डॉलर्सचे योगदान सर्वाधिक आहे. 10 दशलक्ष डॉलर्सचा कॉर्पस तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) सर्व सदस्य देशांच्या एकूण योगदानाइतके योगदान देईल. हा कॉर्पस तयार करण्याचा निर्णय 2019 मध्ये पोलंडमधील कॅटोविस येथे आयोजित वाडाच्या डोपिंग इन स्पोर्टवरील पाचव्या जागतिक परिषदेत घेण्यात आला होता. हे योगदान भारताकडून वाडाच्या मुख्य खर्चासाठी दिल्या जाणाऱ्या वार्षिक योगदाना व्यतिरिक्त आहे.
या योगदानाबद्दल वाडाचे अध्यक्ष विटॉल्ड बांका यांना पत्र लिहून केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, “वैज्ञानिक संशोधनासाठी भारत सरकार वाडा निधीला दहा लाख डॉलर्सची आर्थिक मदत देणार आहे हे सांगताना मला आनंद होत आहे. भारताच्या योगदानामुळे वाडा निधीसाठी 10 दशलक्ष डॉलर्सचे लक्ष्य साध्य करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल अशी आशा आहे.
सदस्य देशांच्या सहकार्याचे कौतुक करताना वाडाचे अध्यक्ष विटॉल्ड बांका यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “वाडा आणि क्लीन स्पोर्टसाठी ही मोठी चालना आहे. अशा प्रकारे खेळांच्या संरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत.”