मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातल्या महानगरपालिका क्षेत्रांमधे उद्यापासून रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करायचा निर्णय आज राज्य सरकारनं जाहीर केला. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय झाला.
येत्या ५ जानेवारीपर्यंत ही रात्रीची संचारबंदी लागू राहील. संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांमधन येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवायचा निर्णयही या बैठकीत झाला. याशिवाय इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना गृहविलगीकरणात ठेवायचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे.
संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या प्रवाशांची, विलगीकरणाच्या पाचव्या किंवा सातव्या दिवशी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. अशा प्रवाशांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्यानंतरच त्यांना घरी सोडलं जाणार आहे.
यादृष्टीनं आंतरराष्ट्रीय विमानतळं असलेल्या क्षेत्रातल्या महापालिका आयुक्तांनी प्रवाशांच्या विलगीकरणासाठी हॉटेल तसंच स्वतंत्र रुग्णालयांची व्यवस्था करायचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. युरोपातून आलेल्या प्रवाशांमधे कोरोनाची लक्षणं आढळली तर त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयांची व्यवस्था केली जाणार आहे.
कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेत आहोत, पुढचे १५ दिवस अधिक सतर्क रहावं लागेल असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं. ब्रिटन मध्ये आढळेल्या कोरोनाच्या नव्या विषाणुची घातकता कळायला अजुन काही दिवस जातील.
मात्र त्याआधीच सतर्क होणं गरजेचं आहे, त्यादृष्टीनं आंतरराष्ट्रीय प्रवाशांची काटेकोर तपासणी करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.