पुणे: दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी दत्त जयंती व 1 जानेवारी 2021 रोजी पेरणे जयस्तंभ येथे अभिवादन कार्यक्रम पार पडणार आहे. कोरोनाचे पार्श्वभुमीवर पेरणे येथे नागरिक एकत्र येवून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये त्या कारणाने तसेच जिल्हयात काही मागण्याकरिता विविध पक्ष व संघटनाकडून आंदोलने, रॅली, मोर्चे, निदर्शने होत आहेत.
उपरोक्त मुद्ये लक्षात घेता, पुणे ग्रामीण जिल्हयात वरील काळामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कलम 36 महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये पुणे ग्रामीण जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना दिनांक 2 जानेवारी 2021 रोजी 24.00 वाजेपर्यंत, रस्त्यावरुन जाणा-या मिरवणूकीतील किंवा जमावातील लोक अशा रितीने चालतील त्यांची वर्तणुक कशी असावी याविषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्याही मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढु नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे, मिरवणूकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेचे आसपास, उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याचे किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यांमध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यावर व धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाचे, कपडे धुण्याचे, उतरण्याचे ठिकाणी जागेमध्ये देवालय किंवा इतर सर्व सार्वजनिक जागी सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्य वाजविणे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविणे याबाबत नियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पीकर) उपयोग करण्याचे नियम करणे व त्यावर नियंत्रण करणे, सक्षम प्राधिका-यांनी हया अधिनियमांचे कलम 33, 35 37 ते 40, 42, 43 व 45 अन्वये केलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे आदी अधिकार प्रदान केले आहेत.