नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधे आढळलेल्या नवीन‘स्ट्रेन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर नंतर इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. काल रात्रीपर्यंत आरटीपीसीआर चाचणी केलेल्या १ हजार १२२ प्रवाशांपैकी १६ प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
यामध्ये नागपूरच्या ४, मुंबई आणि ठाण्याच्या प्रत्येकी ३, पुण्याच्या २ तसंच अहमदनगर, औरंगाबाद आणि रायगडच्या प्रत्येकी एका प्रवाशाचा समावेश आहे. बाधितांच्या निकट सहवासितांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
दरम्यान, स्कॉटलँड वरुन परतलेले बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव मधले दोन जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दोन दिवसापूर्वी विदेशातून परतल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली, यामध्ये कोरोनाग्रस्त आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातल्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.