नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. ते आज नवी दिल्लीत कोविड लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी विविध रुग्णालयांचा दौरा करताना वार्ताहरांशी बोलत होते. या लसीच्या सुरक्षितता आणि प्रभावाबाबत पसरत असलेल्या अफवांपासून सर्वांनी सावध रहाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
लसीकरणाबाबत आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांविषयी सरकार कोणत्याही प्रकारे तडजोड करणार नसल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले.
लस देण्यासाठी आतापर्यंत सुमारे दोन हजार जणांना प्रशिक्षण दिले असून सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरणासाठी मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी तैनात केले असल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली आहे.