नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘वन नेशन, वन गॅस ग्रीड’ या कार्यक्रमाद्वारे देशाला स्वच्छ उर्जा पुरवण्याची ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते आज कोची– मंगळुरू नैसर्गिक वायु पाईपलाईनचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण करताना बोलत होते.
आपल्या सरकारने तेल आणि वायू क्षेत्रात सुधारणांना गती दिली, पुनर्रनवीकरणीय उर्जा सुविधा सुधारली आणि या क्षेत्रातासाठीच्या पायाभूत गरजा जलद गतीने पूर्ण केल्या, असे ते म्हणाले.
२०१४ पर्यंत देशात २४ कोटी गॅस जोडण्या होत्या, त्यानंतर गेल्या ६ वर्षात तितक्याच म्हणजे २४ कोटी नव्या गॅस जोडल्या दिल्या, त्यात उज्वला योजनेअंतर्गत गरीब कुटुंबाना ८ कोटी जोडण्या दिल्या, कोरोना काळात देशात १२ कोटी एलपीजी गॅस सिलेंडर मोफत दिल्याचे त्यांनी सांगितले.
नैसर्गिक वायूची पहिली वाहिनी १९८७ मध्ये सुरु झाली. त्यानंतरच्या २७ वर्षात म्हणजे २०१४ पर्यंत १५ हजार किलोमीटरच्या वाहिन्या टाकण्यात आल्या. मात्र त्यानंतर अवघ्या सहा वर्षात १६ हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या नव्या वाहिन्या टाकल्याचे मोदी यांनी सांगितले.
ऊर्जा क्षेत्रातला नैसर्गिक वायूचा वाटा सध्या ६ पूर्णांक २ दशांश टक्के आहे. तो १५ टक्क्यापर्यंत वाढवला जाईल, असे त्यांनी सांगितले.