मुंबई: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवाप्रवेश नियमात विहित पद्धतीने बदल करुन या कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेत तातडीने समायोजित करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी दिले.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित शासन सेवेतील समायोजनाबाबत विधानभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत आमदार श्री.दीपक केसरकर, मुख्य सचिव श्री.संजयकुमार, वित्त विभागाचे उप सचिव श्री.मु.नी.धुरी, आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ.सतिश पवार, आयुक्त डॉ.रामास्वामी, उप सचिव श्री. व.मु.भरोसे, ग्रामविकास विभागाचे उप सचिव श्री.विजय चांदेकर, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे मुख्य समन्वयक श्री.अरुण खरमाटे, अध्यक्ष श्री.कुंदा सहारे व श्री.किरण शिंदे उपस्थित होते.
श्री.पटोले म्हणाले, कोविड महामारीच्या कालावधीमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे. मंत्री गटाने शिफारस केलेल्या आरक्षण, वय शिथिलता व प्रतिवर्षी अनुभवाप्रमाणे गुण या आधारावर सेवा भरती नियमात विहित पद्धतीने बदल करुन या कर्मचाऱ्यांचे समायोजन विशेष बाब म्हणून तातडीने करावे, असे निर्देश श्री.पटोले यांनी दिले.
मुख्य सचिव श्री.संजयकुमार यांनी ही आरोग्य विभागाने तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत योग्य ती सुधारणा करुन पुढील कार्यवाही तातडीने करावी, असे श्री.पटोले यांनी सांगितले.
यापूर्वी वन कर्मचारी हजेरी सहायक व अन्य विभागातील कर्मचाऱ्याचे समायोजन झाले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विशेष बाब म्हणून समायोजन करण्यात यावे, असे निर्देशही श्री.पटोले यांनी दिले.