मुंबई (वृत्तसंस्था) :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीवर बांधलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाला भेट दिली. राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात आपण विदर्भापासून केली असून, गोसेखुर्द हा महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण केला जाईल. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी पाहणीनंतर आयोजित बैठकीत दिली.
प्रकल्प पूर्ण करतानाच, त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांचं योग्य पुनर्वसन व्हावं, तसंच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य द्यावं, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गोसीखुर्द प्रकल्पाच्या अपूर्ण राहिलेल्या भूसंपादनासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन भूसंपादनाची कामं तातडीनं पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन करावं, अशा सूचना त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी दुपारी चंद्रपूर जिल्ह्यात घोडाझरी कालव्याची पाहणी केली. त्यानंतर पुढं निघालेल्या मुख्यमंत्र्यांचा ताफा शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी थांबवल्यानं खळबळ उडाली. ताफ्यासमोर शेतकऱ्यांची गर्दी पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला ताफा थांबवत वाहनातून उतरून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.