नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सत्तेच्या सुविहित आणि क्रमबद्ध हस्तांतरासाठी कटिबद्ध असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. ट्विटरवर प्रसारित केलेल्या एका ताज्या संदेशात, हल्लेखोरांनी अमेरिकी संसदेच्या इमारतीवर केलेल्या हल्ल्याबाबत ट्रम्प यांनी नापसंती व्यक्त केली आहे.

अमेरिकी संसदेनं आता निकाल स्पष्ट केल्यामुळे नवीन प्रशासन या महिन्याच्या वीस तारखेला सूत्रं हाती घेईल, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्याच्या स्थितीत जखमेवर फुंकर घालणं आणि सामोपचार यांची आवश्यकता असल्याचंही त्यांनी नमूद केलं असून, सत्तेच्या सुविहित हस्तांतरावर आपला सगळा भर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.