मुंबई : खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.

राज्यात विविध भागात खासगी संवर्गातील अनेक ऑटोरिक्षा परिवहन संवर्गातील ऑटोरिक्षाप्रमाणे व्यवसाय करताना दिसून येतात. ही वाहतूक अवैध ठरते. त्यामुळे अशा वाहनास अपघात झाल्यास वाहन तसेच वाहनातील प्रवासी हे नुकसान भरपाईस पात्र ठरत नाहीत. त्यामुळे या ऑटोरिक्षांना विमा सुरक्षा देणे, ऑटो रिक्षाचालकांचा व्यवसाय सुरक्षित करणे, प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करणे अशा उद्देशाने मंत्री दिवाकर रावते यांनी खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणी करुन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी शुल्क भरून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली होती. पण या कालावधीत खासगी संवर्गातील सर्व ऑटोरिक्षा ह्या परिवहन संवर्गात नोंदणीकृत होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाने यासाठी आणखी अवधी द्यावा अशी मागणी होत होती. त्याची दखल घेत खासगी संवर्गातील ऑटोरिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे केली. या संदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती मंत्री श्री. रावते यांनी दिली.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच आमदार राहूल पाटील, शिवसेना ऑटो रिक्षा संघटनेचे संभानाथ काळे यांनीही यासंदर्भात निवेदने दिली होती.

परभणी येथे नुकताच दौऱ्यावर असताना खासगी संवर्गातील अनेक ऑटो रिक्षा अजूनही अवैधरित्या प्रवासी वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. अशी अवैध वाहतूक संबंधित ऑटो रिक्षासह प्रवाशांसाठीही धोकादायक आहे. त्यामुळे परभणीसह राज्यातील खासगी संवर्गातील उर्वरित सर्व ऑटोरिक्षांनी वाढीव मुदतीत आपली वाहने परिवहन संवर्गात नोंदणी करावीत आणि स्वत:सह प्रवाशांची वाहतूक सुरक्षित करावी, असे आवाहन मंत्री श्री. रावते यांनी केले आहे.