मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ८१ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या १९ लाख ९० हजार ७५९ झाली आहे. काल ५० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला.
राज्यात या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ४३८ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५३ शतांश टक्के झाला आहे. तर काल दोन हजार ३४२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले.
राज्यात आतापर्यंत १८ लाख ८६ हजार ४६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ७६ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ५२ हजार ६५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मराठवाड्यात काल दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १९२ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
मुंबईत काल दिवसभरात ७१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले, ५३० नवे रुग्ण आढळले, तर केवळ ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मुंबईतल्या एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ३ लाख २ हजार ७५३ झाली आहे. यापैकी आत्तापर्यंत एकूण २ लाख ८३ हजार ८५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईतलं कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ टक्क्यावर स्थीर आहे. मुंबईतल्या कोरोनाबळींची एकूण संख्या ११ हजार २४२ वर पोचली आहे, तर सध्या ६ हजार ७७२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, मुंबईतला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३९२ दिवस असल्याचं महापालिकेच्या आरोग्य प्रशासनानं कळवलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात काल दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ७ नवे रुग्ण आढळले. आत्तापर्यंत जिल्ह्यातले ८ हजार ९३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याबरोबरच करोनामुक्तीचं प्रमाण वाढून ९५ पूर्णांक १० शतांश टक्क्यावर पोचलं आहे.
लातूर जिल्ह्यात काल २७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात काल ३२ नव्या बाधितांचीही नोंद झाली. सध्या जिल्ह्यात ३८० कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. परभणी जिल्ह्यात काल २१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सध्या जिल्ह्यात १३१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. जालना जिल्ह्यात काल १३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. काल जिल्ह्यातले १८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सध्या जिल्ह्यात १८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नांदेड जिल्ह्यात काल ४० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. काल ३४ नव्या रुग्णांचीही नोंद झाली. सध्या जिल्हाभरात ३३२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. गडचिरोली जिल्ह्यात काल १३ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ११ नवे बाधित आढळले. सध्या जिल्ह्यात १२३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. सातारा जिल्ह्यात काल ७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. काल जिल्ह्यातले ३४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात ७६५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.