मुंबई (वृत्तसंस्था) : २७ जानेवारीपासून राज्यातल्या शाळांमध्ये ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर आता विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासानाने त्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली आहे.
सर्व जिल्ह्यातील प्राथमिक विभागाच्या शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शाळांची स्वच्छता आणि सॅनिटायझेशनचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येत आहे. या कामासाठी ग्रामपंचायत, शालेय पोषण आहार विभागाची मदत घ्या.
माध्यमिकच्या शाळांची स्वच्छता करून घ्या. वर्षभर खोल्या बंद असल्याने दुर्गंधी येऊ नये, संपूर्ण स्वच्छता व्हावी, यासाठी खोल्या उघड्या ठेवा. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाविषयक सर्व खबरदारी घेऊनच शाळा सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांसाठी मास्कची व्यवस्था करण्यात येणार आहे.
प्रत्येक शाळेच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यासही सांगण्यात आले आहे. शिक्षकांनी पालक आणि विद्यार्थी यांची मते जाणून घ्यावीत. पालक सभा घेऊन त्यांना विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचे पटवून द्यावे. असे सांगण्यात आले असून पालक गट, ग्राम शिक्षण समिती, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागरण करण्यात येणार आहे.
सोलापूर, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार २७ जानेवारी पासून जिल्ह्यातील ५ वी ते ८ वीच्या शाळा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. त्यासाठी काल आढावा बैठक घेण्यात आली.
पुणे शहरात इयत्ता पाचवी ते आठवी चे वर्ग सुरू करण्यासंदर्भातला निर्णय पुढील दोन दिवसांत घेतला जाईल अशी माहिती पुणे महापालिकेचे उपायुक्त सुरेश जगताप यांनी दिली आहे.
शाळा सुरू करण्याबाबत महापालिका शाळेच्या सर्व मुख्याध्यापकांची एक बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय होईल, असे जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.