संभाजी ब्रिगेडच्या सतिश काळे यांचा इशारा, श्री. श्री. रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल न केल्याने होणार निषेध

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी श्री. श्री. रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईत भेटून सविस्तर निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना देऊ, असे आश्वासन मंत्री देशमुख यांनी दिले होते. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे २६ जानेवारी रोजी पुणे दौऱ्यावर असणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी निवेदनाद्वारे दिला.

काळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईत भेटून रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यामध्ये वाकड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असल्याचे नमूद केले आहे. पिंपरी चिंचवड पोलिस प्रशासन गुन्हा नोंद करायला टाळाटाळ करत असल्याचे मंत्री अनिल देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले. वारंवार आंदोलन करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे त्या प्रश्नात दखल घेऊन गुन्हा नोंद करण्याची मागणी ब्रिगेडने केली होती. या वेळी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांना व प्रशासनाला योग्य सुचना देऊन कार्यवाही कार्याला सांगू, असे आश्वासन मंत्री अनिल देशमुख यांनी संभाजी ब्रिगेडला दिले.

मात्र त्याबाबत अद्यापही कोणतीच कार्यवाही पोलिसांनी केली नाही. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे हा शिवप्रेमींचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या रविशंकर यांना पाठीशी घालणाऱ्या गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सतीश काळे यांनी निवेदनात नमूद केले. त्यामुळे २६ जानेवारी रोजी गृहमंत्री अनिल देशमुख पुणे दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, सचिव विशाल जरे, कार्याध्यक्ष प्रमोदसिंह गोतारने, संघटक ज्ञानेश्वर लोभे, लहु लांडगे यांच्या सह्या आहेत.