मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत स्ट्रीट फूड हब तयार केला जाणार आहे. त्यामुळे रस्त्यात कुठेही मुंबईकर आपली भूक भागवू शकेल. मुंबईतील ६२ रस्ते स्ट्रीट फूड हबसाठी निवडण्यात आले आहेत. सध्या असलेल्या खाऊ गल्ल्याही स्ट्रीट फूड हब योजनेत विकसित केल्या जाणार आहेत. पाश्चिमात्य देशात असलेल्या या योजना आता आपल्याकडेही सुरू होणार असून संध्याकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत हे फूड हब सुरू राहतील, त्यात फूड ट्रकचाही समावेश असेल, असा या योजनेचा आराखडा मुंबई महानगर पालिकेने तयार केला आहे. घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना चांगल्या दर्जाचे आणि सकस अन्न या योजनेतून मिळेल. योजना मार्गी लागल्यास मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरेल.