मुंबई : राज्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या इतर मागास वर्ग, सामाजिक-शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग विभागासाठी उपसचिव पदाच्या निर्मितीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

इमाव, साशैमाप्र, विजाभज, विमाप्र विभागाकडे पूर्वीच्या 16 योजनांसह मराठा आरक्षण, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण, राज्‍य मागास आयोग, छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यासह इतर संबधित विषय तसेच धनगर समाजासाठीच्या 22 योजना नुकत्याच वर्ग करण्यात आल्या आहेत. तसेच विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्थापन करण्यात आली आहे. विभागाकडील कामाच्या वाढत्या प्रमाणामुळे नवीन पद निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे. नवीन पदनिर्मितीमुळे विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे.