नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध उद्योग आणि व्यापार संघटनांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. विकास, आरोग्य आणि रोजगार केंद्रीत हा अर्थसंकल्प असल्याचे, भारतीय वाणिज्य महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तर हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करणारा असल्याचे, महासंघाचे अध्यक्ष उदयशंकर यांनी म्हटले आहे.

ॲसोचॅमचे अध्यक्ष विनीत अग्रवाल यांनी, अर्थसंकल्पात करदात्यांवर अधिक दबाव टाकण्याऐवजी, आरोग्य आणि पायाभूत सेवांचा विकास साधत, अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याची उपाययोजना केली असल्याचे म्हटले आहे.

शेअर बाजारानेही अर्थसंकल्पाचे स्वागत केले. निर्देशांकाने काल अर्थसंकल्प सादर होताना, २ हजार ३१५ अंकांची उसळी घेतली. काल बाजार बंद होताना, निर्देशांक ४८ हजार ५०० अंकांवर स्थिरावला.