पिंपरी : ‘संताची भुमी म्हणून महाराष्ट्राचे एक वेगळेपण सम्पूर्ण जगासमोर आहे’ यामध्ये अध्यात्माबरोबर विज्ञानवादी संत म्हणून जगतगुरु संत तुकाराम महाराज हे सर्वांच्या परिचयातले आहे. इतकी शतके गेली तरी आजही संताच्या कार्याचा प्रभाव जनमानसावर तसाच टिकुन आहे. हे वेगळे सांगायची गरज नाही. समस्त जनमानसावर नीतिमत्ता, शील आणि जगण्याचा मार्ग संत तुकाराम महाराज यांनी सम्पूर्ण आयुष्यभर समाजाला दिला आज ही संतांची शिकवण मानणारा वारकरी वर्ग खूप मोठया प्रमाणात आहे..!
संत म्हणजे समाजसेवा, संत म्हणजे समानता, संत म्हणजे त्याग आणि समर्पण हे सर्वांना माहिती आहे. पण संत म्हणजे साहित्य हे माञ न चर्चिला जाणारा विषय आहे .भारतातील सर्वच संत उत्तम साहित्यिक होते पण तुकाराम महाराज हे निर्भिड व एका अर्थाने विद्रोही संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे वारकरी साहित्यिक अभ्यासक सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतातच तसेच त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत. तुकोबांच्या अभंगाशिवाय कीर्तन पूर्ण होत नाही. कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे संत म्हणजे जगतगुरु तुकाराम महाराज होते.
मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं
भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि
अमृत तें काय गोड आह्मांपुढें । विष तें बापुडें कडू किती
तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥
असा विचार समाजापुढे ठेऊन वाटचाल करणारे एक निर्भीड संत म्हणून तुकाराम महाराजांची ओळख आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर देखील तुकाराम महाराज यांच्या विचारांचा पगडा दिसून यतोय आणि म्हणूनच स्वराज्य निर्मिती मध्ये संत तुकाराम महाराज यांचे मोलाचे योगदान दिसून येते.
अशा प्रतिभावंत कवी साहित्यिक आणि जीवनला प्रेरणा देणारे संत तुकाराम महाराज यांची जयंती भक्ती शक्ती समुह शिल्प निगडी या ठिकाणी साजरी करण्यात आली.यावेळी पुणे जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदचे जिल्हाध्यक्ष संतोष बादाडे, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील राजेंद्र देवकर विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष नकुल भोईर सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार सागर तापकीर नितीन इंगवले अशोक सातपुते दादा पाटील विजय क्षिरसागर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते