मुंबई (वृत्तसंस्था) : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभ झाला असून त्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आहे.

काल पुण्यात संवाद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी, भीमसेन जोशी यांच्याबरोबर ४० वर्षे साथसंगत करणारे ज्येष्ठ टाळ वादक माऊली टाकळकर यांचा विशेष सत्कार विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आला, संगीतातल्या कालचक्रावर आपली चिरकाल मुद्रा उमटवणारे किराणा घराण्याचे गायक म्हणजे पंडित भीमसेन जोशी अर्थात अण्णा. त्यांच्या स्वराला सिद्धी लाभलेली होती, अशी भावना अभ्यंकर यांनी यावेळी व्यक्त केली.

जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ आणि सत्कार सोहळ्यानंतर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘कानन दरस करो’ या कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणि संगीताच्या विविध पैलूंवर रचलेल्या रचनांचं सादरीकरण श्रीनिवास भीमसेन जोशी आणि विराज श्रीनिवास जोशी यांनी केलं.

मुंबईत ऋत्विक फौंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सनं पंडीतजींना अभिवादन करण्यासाठी ‘स्वरभास्कर १००’ हा दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. उद्या या कार्यक्रमाच्या समारोपात जयतीर्थ मेवुंडी भीमसेन जोशी यांच्या रचना सादर करतील.

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक गुलजार यांनी तयार केलेला पंडीत भीमसेन जोशी हा त्यांचा संगीत प्रवास उलगडणारा माहितीपट फिल्म्स डिव्हिजनतर्फे आज दिवसभर त्यांच्या वेबसाइटवर तसंच यू ट्यूब वर प्रदर्शित केला जाणार आहे.

पुण्यात येत्या शनिवारी-रविवारी दोन दिवसांचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

आर्य संगीत प्रसारक मंडळानं हा अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात संगीत मैफलीबरोबरच भीमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.

संगीताचार्य काणेबुवा प्रतिष्ठान, पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रम करणार आहेत. आज पंडितजींची जन्मभूमी असलेल्या कर्नाटकात गदग इथं एका कार्यक्रमानं सुरुवात होत असून मार्च महिन्यात पुण्यात तीन दिवसांचा ‘ख्याल महोत्सव’ होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या सचिव गायिका मंजुषा पाटील यांनी दिली.