मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण वेगानं सुरु असलं, तरी ब्रिटन आणि ब्राझिलमध्ये ज्या रितीनं कोरोना संसर्ग आणि त्यामुळे होणारे मृत्यू वाढत आहे, हे लक्षात घेऊन आपणही अधिक सावधगिरी बाळगायची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. राज्यमंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबर कोरोनाविषयक सादरीकरण झालं, त्यावेळी ते बोलत होते.
कोरोनाची दुसरी लाट थोपवायची असेल, तर त्यासाठी बेसावध न राहता आरोग्य सुरक्षेचे नियम पाळणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यादृष्टीनंच राज्यात सर्वच व्यवहार बऱ्यापैकी सुरु झाले असले तरी, सरसकट सगळे निर्बंध न उठवता काळजीपूर्वक पावलं टाकली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान ब्राझील आणि इंग्लंमधे अलिकडे झालेल्या कोरोनाबळींच्या संख्येत, कोरोनाच्या नव्या स्वरुपामुळे बळी पडलेल्यांची संख्या अधिक असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी सादरीकरणादरम्यान दिली. नुकत्याच केलेल्या पाहणीत नव्या स्वरुपामुळे कोरोना मृत्यूंचं प्रमाण ४० टक्क्यानं वाढू शकतं असं आढळल्याचंही व्यास यांनी सांगितलं.