नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारचा देशातल्या करदात्यांवर विश्वास असून त्यांना सुविधा देण्यासाठी सरकार काम करत आहे, त्यामुळे करदात्याकडून आलेला प्रत्येक पैसा अधिक संपत्ती निर्माण करण्यासाठी योग्यप्रकारे खर्च झाला पाहिजे, अशी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडली आहे.

मुंबईत केंद्रीय अर्थसंकल्प विषद करण्यासाठी मुंबई भाजपानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अधिकाधिक परतावा मिळेल अशाच पद्धतीनं जनतेचा पैसा गुंतवला पाहिजे. त्यासाठीच केंद्र सरकारनं निर्गुंतवणुकीकरणाचं स्पष्ट धोरण देशासमोर मांडलं आहे.

आजवरच्या प्रत्येक सरकारानं विविध सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यात सुसूत्रता नव्हती. मोदी सरकारनं प्रथमच यासंदर्भात सर्वंकष धोरण मांडल आहे. यापुढे केवळ धोरणात्मक आणि सामरिक क्षेत्रातच सरकारी उद्योग असतील,असं त्यांनी सांगितलं.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीतून बाहेर पडताना प्रगत देश अजूनही धडपडत आहेत, त्याचवेळी भारतानं मात्र या संकटातून बाहेर पडत पुन्हा उभं राहायचा मार्ग शोधला. या सगळ्याचं श्रेय देशातल्या नागरिकांचं आहे, असं त्या म्हणाल्या.

कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाले, तरी उत्पन्नाचा मार्ग म्हणून नागरिकांवर कोविडसंबंधी उपकराचा भार लादायचा विचार सरकारनं कधीच केला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. आज भारत जगभरातल्या शंभरहून अधिक देशांना कोरोना लसींचा पुरवठा करतोय. हे भारताच्या क्षमतांचं प्रतिबिंब आहे असं त्या म्हणाल्या.