नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. बायडन यांच्या विजयाबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

दोन्ही नेत्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. पर्यावरण बदलाबाबत सहकार्याने काम करण्याचंही त्यांनी निश्चित केले. भारत आणि अमेरिका आंतरराष्ट्रीय नियमांना बांधील असून हिंद प्रशांत प्रदेशातल्या शांतता आणि सुरक्षिततेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे मोदी यांनी नंतर ट्वीट करून सांगितले.

प्रधानमंत्री मोदी आणि बायडन यांच्यात अत्यंत सकारात्मक चर्चा होत दोघांनी भविष्यातल्या सहकार्यासाठी महत्वाकांशी अजेंडा निश्चित केला असल्याचे अमेरिकेतले भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू यांनी माध्यमांना सांगितले. कोरोना विरोधातली लढाई, पर्यावरण बदल, जागतिक अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणणे, दहशतवादाविरोधात लढणे, या मुद्द्यांवर एकत्रित काम करण्याचे दोन्ही नेत्यांनी कबूल केल्याचे संधू यांनी सांगितले.