मुंबई (वृत्तसंस्था) : आज मुंबईत तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅनचं लोकार्पण होत असलं, तरी भविष्यात ही सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध करून देण्यात येईल. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज म्हटले.
एनएबीएल ॲक्रीडेटेड आणि आयसीएमआरची मान्यता असलेल्या स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोविड चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी स्पाईस हेल्थला धन्यवाद दिले. या तीन व्हॅन्सच्या माध्यमातून मुंबईत दररोज ३ हजार कोरोना चाचण्या करता येतील. त्यांचा अहवाल २४ तासात मिळेल आणि यासाठी फक्त ४९९ रुपये शुल्क आकारलं जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी यावेळी दिली.
कमी वेळेत कोरोनाचा रिपोर्ट देणारी आणि कमी दरात चाचणीची सुविधा उपलब्ध करून देणारी व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल मुंबईकरांच्या वतीनं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पाईस हेल्थचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमात स्पाईस हेल्थचे अजाय सिंह यांनी व्हॅनमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांच्या आधारे भविष्यात एचआयव्ही सह इतर आजारांच्या चाचण्या ही करता येतील, अशी माहिती दिली.