पिंपरी : केंद्र सरकार पेट्रोल, डिझेलवर नविन कृषीकर आकारणार असल्याचे केंद्रिय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सांगितले. राज्य सरकारचे उत्पादन शुल्क (एक्साइज ड्युटी) कमी करुन केंद्राने कृषीकराच्या नावाखाली स्वत:च्या अखत्यारित नविन कर आणला. यामुळे राज्याच्या उत्पन्नावर परिणाम होईल. कृषीकर हि जनतेची फसवणूक आहे. हा कर रद्द करावा आणि पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर ठेवावेत अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली.

शुक्रवारी (दि. 12 फेब्रुवारी) पुणे आळंदी रस्त्यावर दिघी मॅगझीन चौकात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आणि प्रभाग क्रमांक 3 आणि 4 पेट्रोल, डिझेल भाववाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस विशाल काळभोर, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, राष्ट्रवादी युवक शहर कार्याध्यक्ष योगेश गवळी, उपाध्यक्ष प्रसाद कोलते, सरचिटणीस प्रतीक साळुंके, संघटक मंगशे असवले, सरचिटणीस असिफ शेख, उपाध्यक्ष ऋषीकेश तापकीर, लीगल सेलचे ॲड. सोनाली घाडगे तसेच केशव वाघमारे, मनिषा जठर, प्रतिभा दोरकर, विपूल तापकीर व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.