मुंबई :- थोर समाजसुधारक, क्रांतीकारी संत सेवालाल महाराजांनी समाजातील अज्ञान, अनीती, अंध:श्रद्धा, व्यसनाधीनता, जातीव्यवस्थेसारख्या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. समाजात महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. सत्य आणि अहिंसा हाच खरा धर्म हे त्यांनी सांगितले. प्राणीमात्रांवर, निसर्गावर प्रेम करण्याची शिकवण त्यांनी दिली. मानवतेच्या, प्राणीमात्रांच्या कल्याणाचा विचार दिला. संत सेवालाल महाराजांनी केलेले कार्य आणि दिलेली शिकवण सर्वांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत सेवालाल महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन केले आहे.

संत सेवालाल महाराजांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, संत सेवालाल महाराज हे त्यागी, दूरदर्शी आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारांचे महान संत होते. ‘कोणतीही बाब आधी माहित करून घ्या, शिकून घ्या, प्रत्येक गोष्ट पडताळून पहा, नंतरच त्याचा अवलंब करा’ अशी शिकवण त्यांनी दिली. त्यांनी निसर्गाचे महत्व पटवून देत निसर्गाचा ऱ्हास रोखण्याचे आवाहन त्यांनी केले होते, यापुढच्या काळात पैसे देऊन पाणी विकत घेण्याची वेळ येईल, हे दूरदर्शी विचार त्यांनी त्याकाळी मांडले. देशभर फिरुन निसर्गाप्रती संवेदनशील होण्याबरोबरच शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून देण्याचे काम केले. समाजाला विज्ञानवादी, बुद्धीप्रामाण्यवादी, इहवादी होण्याची शिकवण दिली. त्यांच्या दोहे आणि भजनांनी समाजाला सन्मार्गावर नेण्याचं कार्य केलं. संत सेवालाल महाराजांच्या विचारांवर सर्वांनी मार्गक्रमण करण्याचा निर्धार आपण सर्वांनी करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.