मुंबई : सायन पनवेल महामार्गावर अपघात रोखण्यासाठी खाडीपूल येथे प्रसरण सांध्यांची दुरुस्ती, भुयारी पादचारी मार्ग तसेच पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनांची कामे निश्चितच पूर्ण केली जातील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली या रस्त्यावरील समस्यांच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई विभागाचे मुख्य अभियंता के. टी. पाटील, अधीक्षक अभियंता सु. ल. टोपले, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे मुख्य अभियंता संदीप पाटील यांच्यासह खारघर येथील बळीराम नेटके आदी उपस्थित होते.

सायन पनवेल महामार्गावर जुई खाडीपूल व तळोजा खाडीपूल येथे रस्त्यालगत घळई निर्माण झाल्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रसरण सांध्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. या अनुषंगाने तांत्रिक मान्यता देऊन तात्काळ काम पूर्ण करावे, असे निर्देश राज्यमंत्री श्री.भरणे यांनी दिले.

सायन पनवेल महामार्गावरील भुयारी पादचारी मार्गांची कामे व्यवस्थित न झाल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे त्याचा वापर करता येत नसल्यामुळे मुख्य महामार्गावरुन रस्ता ओलांडला जात असून अपघाताचा धोका वाढतो. तसेच पादचारी पुलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्वाहन (लिफ्ट) ची तरतूद असताना प्रत्यक्षात लिफ्ट बसवण्यात आल्या नाहीत. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पथदिवे (स्ट्रीट लाईट) बंद असल्यानेही अपघाताचा धोका वाढतो, आदी बाबी या बैठकीत मांडण्यात आल्या. या सर्व समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी यावेळी दिली.