पुणे : सोशल नेटवर्किंग साईटवर अनेकजण दिवसातला बराच वेळ खर्ची घालतात. या सोशल नेटवर्किंग साईट्सवरून कोणताही विषय अत्यंत कमी वेळात दूरपर्यंत प्रभावीपणे जाऊन पोहोचतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कधीही वाईटच असतो. आजची तरुण पिढी तर सोशल नेटवर्किंगच्या पूर्ण आहारी गेली आहे. कुठलेही तंत्रज्ञान हे माणसाच्या प्रगतीसाठी फायद्यासाठी असते हे जरी खरे असले तरी त्याच्या वापराचे योग्य भान ठेवले नाही तर या माध्यमामुळे माणसाचे व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्य कसे धोक्यात येऊ शकते हे दाखवून देणारा ‘इमेल फिमेल’ हा मनोरंजक मराठी चित्रपट २६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘एस.एम.बालाजी प्रोडक्शन’ प्रस्तुत ‘इमेल फिमेल’ या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे.

मध्यमवर्गीय शंतनू आणि त्याच्या कुटुंबाची कथा ‘इमेल फिमेल’ या चित्रपटात मांडण्यात आली आहे. शंतनू व प्राजक्ता हे जोडपं आणि त्यांची मुलगी गार्गी यांच्या सुखी त्रिकोणी कुटुंबाला एका छोट्याशा घटनेने वेगळे वळण मिळते. हे वळण नेमकं कशामुळे येतं? हे दाखवतानाच सोशल माध्यमाचा चुकीचा वापर करत अभिव्यक्त होण्याची घाई कशी अंगाशी येऊ शकते हे कटू सत्य मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. विनोदी पद्धतीने मार्मिक भाष्य करणारा हा चित्रपट प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. निखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन यांच्या इमेल फिमेल’ चित्रपटात भूमिका आहेत.

कथेला अनुसरून तीन वेगवेगळ्या जॉंनरची गाणी चित्रपटात आहेत. चित्रपटाची पटकथा भक्ती जाधव यांची आहे. संवाद भक्ती आणि योगेश जाधव यांनी लिहिले आहेत. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन राजेश राव यांचे आहे. कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. सोनू निगम, जावेद अली, आनंदी जोशी, ममता शर्मा यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड आणि अभिजीत नार्वेकर यांनी संगीताची तर पार्श्वसंगीताची जबाबदारी प्रकाश नर यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन राजेश बिडवे, सीमा देसाई तर वेशभूषा सुहास गवते आणि देवयानी काळे यांची आहे. कार्यकारी निर्माते स्वप्नील वेंगुर्लेकर आहेत. निर्मिती सल्लागार अविनाश परबाळे आहेत.

२६ फेब्रुवारीला इमेल फिमेल प्रदर्शित होणार आहे.